--
पुणे : पुणे शहरातील नूपुर पाटील यांनी दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आयर्नमॅन २०२१ या स्पर्धेत उल्लेखनीस यश मिळविले. केवळ ७ तास २७ मिनिटांत ही कठीण स्पर्धा पूर्ण करत नूपुर यांनी या स्पर्धेत महाराष्ट्राची वेगळी मोहोर उमटविली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये ‘आयर्नमॅन २०२१’ या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. या स्पर्धेमध्ये दुबई येथील जुमेरा बीचवर दोन किमी पोहणे, ९० किमी सायकल चालविणे आणि २१ किमी धावणे अशा टप्प्यात ही आयर्नमॅन स्पर्धा झाली होती. जगभरातून अनेक खेळाडू या स्पर्धेस सहभागी झाले होते. दुबई येथे होणारी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा ‘जागतिक आयर्नमॅन’ या स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. नूपुर यांनी स्पर्धेतील विशेष कामगिरी बजालविल्याने त्यांना ‘जागतिक आयर्नमॅन’ स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात जागतिक आयर्नमॅन स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेबाबत नूपुर म्हणाल्या की, दुबईत ही स्पर्धा पूर्ण करताना फ्लॅट आऊट फास्ट रनकडे जाणे हे खूप आव्हानात्मक होते. कारण दुबईमधील सर्वात उष्ण महिन्यात ही स्पर्धा होती. त्यामुळे समोरून वेगवान गरम वाऱ्याचे झोत येत असताना पळणे न थकता चालू ठेवणे खूप कठीण होते. एका क्षणी ही स्पर्धा सोडावी की काय असा विचार होता. मात्र जिद्द व चिकाटीने ही स्पर्धा पूर्ण करणे शक्य झाले.
नूपुर या आरोग्य व आहारतज्ज्ञ असून त्या मूळच्या अहमदनगरच्या आहेत. पुण्याच्या सेंट हेलेनाज स्कूलमधून प्राथमिक, अहमदनगरच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर फिलिपिन्समध्ये कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतलेले आहे. नूपुर यांचे पती ऋषभ पाटील यांनी स्पर्धेसाठी प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. नूपुर या ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या त्या नात आहेत तर राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भाची आहेत.
————————————————
फोटो ओळी : पुणे येथील नूपुर पाटील यांचा सायकल स्पर्धा पूर्ण करतानाचा फोटो.
०९०४२०२१-बारामती-०७
————————————————