पुणे : विद्यार्थ्यांमधील व्यवस्थापन कौशल्य व क्षमतेला व्यासपीठ देण्यासाठी एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंट यांच्या वतीने व लोकमतच्या सहयोगाने ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनदिवसीय महोत्सवास एमआयटी कोथरूड कॅम्पसमध्ये गुरुवारपासून सुरुवात होत असून महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.व्यवस्थापनशास्त्राशी संबंधित असलेल्या ‘एम-पॉवर’ या महोत्सवाचे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षण आहे. या वर्षीही महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून विद्यार्थ्यांमध्ये एम-पॉवरची के्रझ असल्याचे दिसते. तरुणांमधील कौशल्य विकासाला ‘लोकमत’ने नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमालाही ‘लोकमत’ सहकार्य करीत आहे. व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांचे नैपुण्य, कौशल्य व स्पर्धा क्षमतेचा कस या महोत्सवात लागणार आहे. स्पर्धकांचा एकूण कल व त्यांच्यातील व्यवस्थापन क्षमता पाहून भविष्यातील त्यांची व्यवस्थापक बनण्याची क्षमता विकसित करण्याचे काम एम-पॉवर अनेक वर्षांपासून करीत आहे. या वर्षी महोत्सवाची संकल्पना वेगळी असेल. ‘रिअल लाईफ लेसन्स फ्रॉम रील लाइफ’ अशी या वर्षीची संकल्पना आहे. याआधारे विविध चित्रपटांतून व्यवस्थापनकलेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बाजी’ चित्रपटातील श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी हे कलाकार महोत्सवास उपस्थित राहणार आहेत.मागील वर्षी शंभरपेक्षा जास्त महाविद्यालयांतील सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी ‘एम-पॉवर’च्या जुगाड या स्पर्धेतील विजेत्यांना होंडा अॅक्टिवा ही दुचाकी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. एम-पॉवरची संपूर्ण टीम महोत्सव यशस्वी करण्यासाठी जोमाने तयारी करीत आहे.(प्रतिनिधी)