पुणे : सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराला गतवैभव मिळवून देण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून शहरात जवळपास १२३ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारले होते. मात्र, त्यावर झालेले अतिक्रमण, महापालिकेनेच उभारलेले बसथांबे, महावितरणचे डीपी बॉक्स, तर नगरसेवकांच्या फ्लेक्सचे अतिक्रमण तसेच यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या ट्रॅकला कुठेही एकमेकांशी सलगता नाही. त्यामुळे हे शहरात दरवर्षी केवळ माहिती फलक बदलण्यापुरतेच उरले आहेत.जवळपास ९० ते २००० च्या दशकापर्यंत पुणे सायकलींचे शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यानंतर गेल्या दीड दशकात शहराचा विकास झपाट्याने झालेला आहे. त्यामुळे शहरातील सायकलींची जागा दुचाकींनी घेतली. त्यामुळे सायकल वापरणाऱ्यांची संख्या कमी होऊन शहराच्या प्रदूषणातही वाढ झालेली आहे. त्यामुळे २००७पासून महापालिकेकडून शहरात जेएनएनयूआरएम योजनेतून शहरातील रस्त्यावर पुन्हा सायकल ट्रॅक उभारण्यात आले. मात्र, गेल्या सात वर्षांत प्रत्येक वर्षी या ट्रॅकवर केवळ सूचना फलक आणि देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली खर्च करण्यात आला आहे. एकीकडे महापालिकेकडून सायकल वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सर्वंकष सायकल आराखडा तयार करण्यासाठी १ कोटी १५ लाख रुपये मोजून सल्लागार नेमला जात असताना, दुसरीकडे मात्र, शहरात किती सायकली आहेत, अस्तित्वातील ट्रॅक एकमेकांना जोडलेले आहेत का, किती नागरिक त्याचा वापर करतात, याची माहिती न घेताच पुन्हा एकदा केवळ कागदी घोडे नाचविण्यावर भर दिला जात आहे. प्रोत्साहनासाठी काहीच नाहीमहापालिकेकडून सायकल ट्रॅकचा विषय निघाला की त्याच्या देखभाल व दुरुस्ती व्यतिरिक्त काहीच केले जात नाही. प्रत्यक्षात शहरात किती सायकली आहेत, नियमित सायकल वापरणारे घटक कोणते, सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काही नियोजन करणे, अशा बाबींकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे महापालिकेला केवळ देखभाल व दुरुस्तीतच रस असल्याचे दिसून येत आहे. हे सायकल ट्रॅक उभारल्यापासून त्यावर केवळ फलक लावणे, दुरुस्ती करणे एवढेच काम करण्यात आलेले आहे. पण प्रोत्साहनासाठी एकही उपक्रम गेल्या आठ वर्षांत महापालिकेने घेतलेला नाही.अतिक्रमणांचा बाजारशहरातील सायकल ट्रॅक हे अतिक्रमणांसाठी सॉफ्ट टार्गेट बनले आहेत. खासगी व्यक्तींच्या अतिक्रमणांपासून महापालिकेनेही आपली अतिक्रमणे या ट्रॅकवर थाटलेली आहेत. त्यात कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, हडपसर रस्ता, सातारा रस्ता या प्रमुख रस्त्यांवर तर महापालिकेनेच पीएमपीचे बसथांंबे उभारले आहेत. ज्या ठिकाणी बस ाांबे नाहीत त्या ठिकाणी महावितरणचे डीपी आहेत. ज्या ठिकाणी डीपी नाहीत तेथे पालिकेच्या कचरापेट्या आहेत. जेथे कचरापेट्या नाहीत, तेथे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे अतिक्रमण आहे. यातूनही शेवटी जागा उरलीच तर खाद्यपदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. त्यामुळे सायकल ट्रॅक नक्की कोणासाठी, हा सवाल उपस्थित होतो. शहरांतर्गत भागात ट्रॅकवर अतिक्रमण नसले तरी, त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.
हरवले सायकल ट्रॅक
By admin | Updated: October 26, 2015 02:06 IST