लॉकडाउन करण्याचा निर्णय न करता जनतेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनामार्फतच सक्तीची, कडक व काटेकोरपणे करावी. प्रशासनाने घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची तपासणी करून वयाची अट न घालता लसीकरण मोहीम सक्तीची करणेकामी तातडीने उपाययोजना करावी. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा त्वरित उपलब्ध करून सर्व सोयीयुक्त कोरोना सेंटर्स उभारण्यात यावेत. तपासणी व लसीकरण पथके स्थापन करून सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविणेकामी तातडीने कार्यवाही व्हावी, अशा मागण्या राज्य सरकारकडे हाजी इर्शाद आतार यांनी केल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे झालेले हाल व त्याचे दुष्परिणाम अजूनही दिसून येत आहेत. सर्वसामान्य नागरिक, मोलमजुरी करणारी व्यक्ती, छोटे मोठे व्यावसायिक अजूनही मागे झालेल्या लॉकडाऊनमधून सावरले नसून वारंवार होत असलेल्या महागाईमुळे ते त्रस्त झाले असून त्याचे समोर उत्पन्न निर्माण करण्याचा व कुटुंबाचे पालनपोषण करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच राज्य सरकारने लॉकडाऊनचा मार्ग न निवडता प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे सक्तीने व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे.