पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात जिवंत देखावे सादर करण्यासाठी मंडळांमध्ये चढाओढ दिसत आहे. जिवंत देखाव्यांमधून स्त्रीभ्रूणहत्या, दप्तराचे ओझे यासारखे समाजप्रबोधनपर विषयांची माहिती देण्याचा आगळावेगळा प्रयत्न होत आहे. याचबरोबर ऐतिहासिक, पौराणिक विषयांवरील जिवंत हलते देखावेही मंडळांनी उभारले आहेत. त्याचबरोबर वैज्ञानिक देखावे, विद्युत रोषणाई यांचीही संख्याही लक्षणीय आहे. शनिपार मंडळ ट्रस्ट या मंडळाने किल्ले पन्हाळगडची प्रतिकृती उभारली आहे. शिवाजी महाराज किल्ल्यावर असताना आदिलशहाचा सरदार सिद्धी जौहरने किल्ल्याला वेढा टाकला होता. त्यावेळेस विश्वासू सरदार शिवा काशीद यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून महाराजांना वेढ्यातून सुखरूप सोडले आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले. शिवा काशिदांची ही स्वामीनिष्ठा लोकांपर्यंत पोहचवाव, या हेतूने हा देखावा उभारला आहे. मंडळाचे अध्यक्ष शेखरसाळुंखे आहेत.विश्रामबाग मित्र मंडळाने ‘गोष्ट एका शेतकऱ्याची’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्याची व्यथा या नाट्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नितीन कोतवाल हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.नारायण पेठेतील श्री गरुड गणपती मंडळाने शिवकालीन देखावा सादर केला आहे. जिजाऊ यांच्या इच्छेसाठी स्वत:च्या मुलाचे लग्न टाकून तानाजी मालसुरे कोंढाणा जिंकण्यासाठी जातात आणि आपल्या प्राणांचे बलिदान देतात. त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून त्यांचा भाऊ सूर्याजी मालसुरे यांच्याबरोबर किल्ला लढवतात आणि जिंकतात. याचे चित्रण ‘गड आला पण सिंह गेला’ या नाट्यामध्ये मांडले आहे. छत्रपती संभाजी महाराज पूलाजवळील नवचैतन्य मंडळाने स्त्री भ्रूण हत्याविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी जिवंत देखावा सादर केला आहे. मुलींचे घटते प्रमाण आणि मुलीच्या जन्माविषयी समाजामध्ये असणारी मानसिक वृत्ती बदलणे गरजेचे आहे, असे भाष्य या नाट्यामध्ये केले आहे. (प्रतिनिधी)
जिवंत देखाव्यांचे आकर्षण
By admin | Updated: September 24, 2015 03:07 IST