पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रकाशक उमेदवाराच्या प्रचाराची साहित्य परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पडद्याआडून मोहीम सुरू केली आहे. या मागे परिषदेच्या आगामी निवडणुकीची गणिते असल्याचे साहित्य वर्तुळात बोलले जात आहे.अध्यक्षपदाची निवडणूक यंदा पंचरंगी होत आहे. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाकडे असले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिका रवाना केल्या आहेत. बृहन महाराष्ट्रात असलेल्या मतदारांना मतपत्रिका मिळू लागल्या असल्याचा रिपोर्ट निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला असल्याचे सांगण्यात येते आहे.अध्यक्षपदाची निवडणूक साहित्यिक असते, पण यंदा साहित्यिक असलेले आणि प्रकाशक म्हणूनच जास्त परिचित असलेले अरुण जाखडे रिंगणात आहेत. त्यामुळे परिषद पदाधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथविक्रीच्या मुद्द्यावरून घुमान संमेलनादरम्यान जाखडे यांनीच सुरुवातील विरोधी सूर लावला होता. घुमानला मराठी लोक नसल्याने ग्रंथ, पुस्तकविक्री होणार नाही, असे प्रकाशकांच्या वतीने सांगण्यात येत होते. पण कालांतराने जाखडे यांचा विरोधी सूर मावळून तेही संमेलनाच्या व्यासपीठावर गेले.हा इतिहास ज्ञात असला तरी पुढील वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवी कार्यकारिणी अस्तित्वात येणार आहे. पिंपरीचे साहित्य संमेलन उरकले की साहित्यिक मंडळी निवडणुकीच्या कामाला लागती. निवडणुकीत प्रकाशकांचे सहकार्य मिळावे म्हणूनच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पडद्याआडून जाखडे यांचा प्रचार सुरू केला असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. जाखडे निवडून आले तर सध्याच्या पदाधिकाऱ्यांना चालण्यासारखे आहे. आणि नाही निवडून आले तर ‘आम्ही तुम्हाला मदत केली होती’ असे सांगण्यास मोकळे होतील.(प्रतिनिधी)
साहित्य परिषदेचे बेरजेचे राजकारण
By admin | Updated: September 27, 2015 01:36 IST