विशाल विकारी, लोणावळालोणावळा-अॅम्बी व्हॅली मार्गावरील लायन्स पॉइंट या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता कसलीही सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात जीव धोक्यात घालत आहेत. ते सुरक्षा रेलिंगच्या पुढे जात दरीच्या तोंडावर उभे राहणे, दगडांवर बसून सेल्फ ी काढणे, अशा जीवघेण्या पद्धतीने पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पोलीस बंदोबस्त व वन विभागाने सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे़ अन्यथा, या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़पर्यटननगरीच्या नावलौकिकात मोलाची भर घालण्याचे काम हातवण येथील लायन्स पॉइंटने आजवर केले आहे़ या ठिकाणी लायन्स पॉइंट, गिधाड तलाव व धबधबा, शिवलिंग पॉईट, मोराडी शिखर ही ठिकाणे असल्याने बारमाही पर्यटकांची, विशेषत: युवा पर्यटकांची मोठी गर्दी असते़ शनिवार व रविवारी रात्रीही हे ठिकाण पर्यटकांनी गजबजलेले असते़ सदर जागा ही वन विभागाची आहे़ पर्यटकांच्या धोकादायक पर्यटनामुळे मागील दहा वर्षांत २५हून अधिक पर्यटकांचा दरीत पडून मृत्यू झाला आहे़ ‘लोकमत’ने या ठिकाणच्या सुरक्षेबाबत वेळोवळी वृत्त प्रसिद्ध केले होते़ याची दखल घेत मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांच्या माध्यमातून संपूर्ण दरीला लोखंडी रेलिंग बसविण्यात आले होते़ मात्र, हुल्लडबाज पर्यटकांनी यातील काही रेलिंग तोडले असून, चोरट्यांनी काही रेलिंगचे खांब लंपास केले आहेत़ यामुळे तुटलेल्या रेलिंगमधून पर्यटक मोठ्या प्रमाणात दरीच्या तोंडावर जाऊन बसतात व धोकादायक पद्धतीने पर्यटन करत आहेत़ यापूर्वीदेखील अनेक वेळा दरीच्या तोंडावर बसून फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून दरीत पडल्याने पर्यटकांचे मृत्यू झाले आहेत़ मात्र, या धोकादायक पर्यटन करणाऱ्या पर्यटकांना जरब बसविण्याकरिता या ठिकाणी पोलीस यंत्रणा नाही, तसेच वन विभागाचे सुरक्षारक्षकदेखील नाहीत़ यामुळे स्थानिक व्यावसायिकांच्या सूचनांना न जुमानता पर्यटक अगदी दरीच्या तोंडावर जातात.रात्रीच्या पार्ट्यांचे प्रसिद्ध ठिकाणलायन्स पॉइंट हे ठिकाण दिवसाप्रमाणे रात्रीच्या पार्ट्यांकरिता प्रसिद्ध ठिकाण आहे़ पुणे व मुंबईचे हजारो युवा पर्यटक या ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या करण्यासाठी येतात़ यामध्ये मद्य, हुक्का, चरस, गांजा इत्यादींच्या पार्ट्या केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई करत पर्यटकांना रात्रीच्या वेळी या ठिकाणी जाण्यास बंदी घातली होती़ मात्र, कालांतराने पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे़ रात्रीच्या या पार्ट्यांमुळे परिसरात सर्वत्र दारूच्या बाटल्या व बाटल्या फ ोडल्यामुळे काचांचा ढीग साचला आहे़ अनेकांना या काचा पायांना लागून जखमा झाल्या आहेत़ या सर्व घटनांवर वचक ठेवण्यासाठी व येथे होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस कारवाईची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे़ बारमाही धुके असणारे सदाबहार ठिकाणलायन्स पॉइंटच्या परिसरात बारमाही धुके व थंड हवा असे वातावरण असल्याने हे ठिकाण प्रत्येकाला हवेहवेसे वाटते़ मात्र, मद्यपी व हुल्लडबाज पर्यटकांच्या अतिरेकामुळे, तसेच रात्री होणाऱ्या पार्ट्या, त्यामधून होणारे वाद व अतिउत्साहामुळे दरीच्या अगदी तोंडाजवळ गेल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामुळे या पर्यटनस्थळांच्या नावलौकिकाला धक्का लागला आहे़ वास्तविक कोकणचे समग्र दर्शन घडविणारे हे निसर्गरम्य ठिकाण पर्यटकांसाठी एक पर्वणी आहे़वन विभागाचे दुर्लक्षपर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची प्रथम जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र, त्यांचेच दुर्लक्ष झाले आहे़ पॉइंटच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असून, पर्यटकांना त्यात उभे राहून निर्सगाचा आनंद घ्यावा लागतो आहे़रेलिंग नव्याने बसविण्याची गरजलायन्स पॉइंटच्या दरीला बसविलेल्या सुरक्षा रेलिंग मोठ्या प्रमाणात तुटल्या आहेत़ यामुळे पर्यटक धोकादायकरीत्या दरीच्या तोंडाजवळ जातात़ हे प्रकार बंद करण्यासाठी वन विभागाने तुटलेल्या रेलिंगच्या जागी नवीन रेलिंग बसविणे गरजेचे आहे़ सुरक्षेकरिता सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे़
‘लायन्स पॉइंट’ बनलाय ‘धोकादायक’
By admin | Updated: July 6, 2015 04:53 IST