पिंपरी : महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) आणि परिसरात उद्योगांना पूरक वातावरण निर्माण होत आहे. शासनाच्या उद्योगवाढीच्या धोरणामुळे पिंपरी-चिंचवडशेजारच्या तळेगाव दाभाडे, तसेच चाकण एमआयडीसीत असंख्य जगप्रसिद्ध, बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्या आकर्षित होत आहेत. उद्योगासंदर्भातील हे सकारात्मक बदलते धोरण रोजगारनिर्मितीस चालना देणारे ठरत आहे. दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधून उद्योगांचे स्थलांतर कायम आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्राच्या आजुबाजूला चाकण, तळेगाव, तसेच रांजणगाव, बारामती, शिरूर आदी भागांत थोड्याफार अंतरावर एमआयडीसी आहे. आॅटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्नॉलॉजी, फूड आदी उद्योग येथे फोफावले आहेत. रांजणगाव एमआयडीसीत पंचतारांकित सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. (प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा शेजारच्या तळेगाव आणि चाकण भागात उद्योगवाढीस अधिक संधी आहेत. त्यामुळे नव्या कंपन्या या भागाकडे आकर्षित होत आहेत. तसेच, पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’लगत असल्याने वेगवान वाहतुकीला पसंती दिली आहे. तैवान, चीन, जपान या देशांतील बहुराष्ट्रीय, तसेच भारतातील असंख्य कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तळेगाव, तसेच चाकण भागात पाहणी केली आहे. त्यांना हा भाग अनुकूल वाटला असून, येथे उत्पादन, संशोधन आणि विकास प्रकल्प उभारण्यास ते उत्सुक आहेत. अनेक कंपन्या गुंतवणुकीस सरसावल्या आहेत. तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील टप्पा दोनमध्ये नवलाख उंब्रे, बधलवाडी, मिडेवाडी या भागातील ४५४.९७६ हेक्टर जमीन ताब्यात घेतली आहे. भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्वरित अंतर्गत विकास केला जाणार आहे. चाकणमधील सावरदरी, खालुंब्रे, वासुर्ले, शिंदे, गागोले, वराळे या गावांच्या १ हजार ३६५ हेक्टर भागात चाकण औद्योगिक टप्पा दोन विकसित केला आहे. अनेक परदेशी कंपन्या येथे येण्यास उत्सुक आहेत. त्या संदर्भात राज्य शासनातर्फे करार केले जात आहेत.केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’चा नारा देत परदेशी कंपन्यांना निमंत्रण दिले आहे. अनेक परवान्यांची संख्या कमी करुन, वेगवेगळ्या शुल्कांत सवलत दिली आहे. केंद्रासोबत राज्य शासनाचे धोरण उद्योगवाढीस पूरक ठरत असल्याचे चित्र आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहराभोवती इतर एमआयडीसी वसलेल्या आहेत. त्यामुळे या सर्व एमआयडीसींमध्ये एकसंधता निर्माण झाली आहे. तसेच दळणवळणासाठी चांगले रस्ते आहेत.बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात उत्पादन, विकास आणि संशोधन करण्यास उत्सुक आहेत. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शासनांशी चर्चा करीत आहेत. संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी तळेगाव दाभाडे भागात नुकतीच जागेची पाहणी केली. त्यांनी तेथील पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’लगतच्या परिसराची मागणी केली आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीने या भागात सुमारे दीड एकर जागेची मागणी केली आहे. उद्योगांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता टप्पा तीन व चारचाही विकसित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्य शासनाचे उद्योगपूरक धोरण्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत. तळेगाव आणि चाकण एमआयडीसी क्षेत्राला कनेक्ट असलेला एमआयडीसीची संख्या अधिक आहे. तसेच, दळणवळणाच्या उत्तम पायाभूत सुविधा आहेत. कुशल कामगारांची मुबलकता आहे. त्याचबरोबर, शासनाने वेगवेगळ्या असंख्य शुल्कास सूट दिली आहे. तसेच, परवानापद्धत अधिक सुलभ केली आहे. यामुळे या भागात उत्पादन प्रकल्प उभारण्यास अनेक कंपन्या येत आहेत.- अजित देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, पुणे विभाग
तळेगावला कंपन्यांची पसंती
By admin | Updated: October 11, 2015 04:28 IST