पुणे : हेल्मेट वापरासाठी आता पोलीस मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणार असून, प्रामुख्याने तरुणांना हेल्मेट घालण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. जे वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्या वाहनचालकांच्या पालकांना पत्रे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी दिली. या वेळी माथूर बोलत होते. वाहतूक पोलीस आणि रोटरी क्लबच्या वतीने शहरातील ५०० रोटरॅक्ट सदस्यांना हेल्मेट वाटप करून हेल्मेट व रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला़ माथूर म्हणाले, की हेल्मेट जनजागृतीसाठी विमा कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. दुचाकी वाहन विक्री करणाऱ्या वितरकांना वाहन विक्री करतानाच हेल्मेट पुरविण्यासंबंधी सूचना देण्यात येतील़ जे वाहनचालक हेल्मेट वापरणार नाहीत़ त्यांचा डाटाबेस तयार करण्यात येणार आहे़ तसेच, अशा वाहनचालकांच्या पालकांना पत्र अथवा ई -मेलद्वारे माहिती देण्यात येईल़ तसेच काही संस्थांनाही या उपक्रमामध्ये सहभागी करून हेल्मेट जनजागृती व रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीबाबत उपक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ़ दीपक शिकारपूर, भावी प्रांतपाल विवेक अराहना यांनी मार्गदर्शन केले़ या वेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे उपस्थित होते़
हेल्मेट नसल्यास पालकांना पत्र
By admin | Updated: July 2, 2014 01:40 IST