लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : आचार्य अत्रे यांच्या सासवड गावात आम्हाला माय तिकीट योजनेअंतर्गत कार्यक्रम करण्याची संधी मिळाली आहे. आचार्य अत्रे यांचे पोष्टाचे तिकीट शासनाने काढावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे तिकीट विशेष कव्हर म्हणून छापण्याचा प्रस्ताव द्यावा. त्यास त्वरित मंजुरी देऊ, असे प्रतिपादन डाकघर पुणे ग्रामीणचे अधीक्षक राजगणेश घुमारे यांनी सासवड येथे केले.
सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात डाक विभागाच्या वतीने तिकीट व मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते होते. या योजनेअंतर्गत आचार्य अत्रे व काही मान्यवरांचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश साखळकर, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, पानवडीचे उपसरपंच भिसे, डाक निरीक्षक मारोती मेढे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने आचार्य अत्रे यांचे सासवड गाव ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली असल्याची माहिती विजय कोलते यांनी दिली. सभापती नलिनी लोळे, पंकज धिवार, अॅड. अण्णासाहेब खाडे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास साहित्य परिषद सासवडचे कार्याध्यक्ष खाजाभाई बागवान, डॉ. जगदीश शेवते, प्रतिष्ठानच्या विश्वस्त शशिकला कोलते, श्रीकृष्ण पुरंदरे, बंडूकाका जगताप उपस्थित होते. सासवडच्या उप डाकपाल सविता वाघ यांनी स्वागत केले. अभिजित काळे यांनी मे स्टॅम्प योजनेची माहिती दिली. जनार्दन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो : सासवड येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानमध्ये मे तिकीट योजनेअंतर्गत आचार्य अत्रे याचे पोस्टाचे तिकीट प्रकाशन करण्यात आले.