तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यातील फलोदे या आदिवासी गावामध्ये आठ-नऊ महिन्यांपासून गावातील निरक्षर महिला साक्षरतेचे धडे गिरवत आहे. आदिवासी भागातील आपल्या निरक्षर भगिनींना निदान लिहिता-वाचता तरी यावे यासाठी शहीद राजगुरु ग्रंथालय, फलोदे यांनी पुढाकार घेऊन आदिवासी भागातील फलोदे या गावामध्ये साक्षरतेचे वर्ग सुरू केले आहेत. या गावातील महाविद्यालयीन युवती स्वयंस्फूर्तीने गावातील निरक्षर महिलांना ग्रामपंचायत कार्यालयात शिकवत आहेत. गावातील सुशिक्षित तरुण मुली या महिलांना वाचन, मुळाक्षरे यांची ओळख करून देणे, स्वत:ची स्वाक्षरी करण्यास शिकवतात. त्या नुसते लेखन वाचन शिकतात, असे नाही तर साक्षरता वर्गात त्या कायदा साक्षरता, आरोग्य साक्षरता, अंधश्रद्धा निर्मुलन, शासकीय योजनांची माहिती, आदिवासी उपाययोजना या बाबतची माहिती समजून घेत आहेत. या साक्षरता वर्गामध्ये ३५ ते ६५ या वयोगटातील ६० ते ७० महिला साक्षरतेचे धडे घेत आहेत.ग्रामपंचायत सरपंच अशोक पेकारी, उपसरपंच मंदा मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे सुरू आहे. रोटरी क्लब मंचर, रोटरी क्लब मेट्रो व राज्य साधन केंद्र, पुणे यांनी या उपक्रमास शैक्षणिक साहित्य देऊन सहकार्य केले आहे. या निरक्षर आदिवासी महिलांना यातून स्फूर्ती मिळावी, यासाठी या नवसाक्षर महिलांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मुख्याध्यापक रघुनाथ उतळे व मुंबई येथे पोलीस उपनिरिक्षक म्हणून कार्यरत असलेले वसंत आढारी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष भोकटे, देविका भोकटे, फलोदेचे सरपंच अशोक पेकारी, उपसरपंच मंदा मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोडे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी वर्षा मसळे इ. उपस्थित होते.
फलोदे गावात महिला गिरवताहेत साक्षरतेचे धडे
By admin | Updated: April 23, 2017 04:11 IST