जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. बिबट्या भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीमध्ये घुसू लागले आहेत. बिबट्यांचे लोकवस्तीमध्ये घुसून कुत्रे, शेळ्या अशा पाळीव जनावरांवर हल्ले करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आणे गावातील आनंदवाडी येथील रानवस्तीवर काल(दि.६) जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विनोद गांडाळ यांचा मुलगा हृषीकेश आपल्या ओट्यावर असलेल्या शेळ्या घरात बांधत असताना अचानक बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्याचे पाहिल्यावर हृषीकेश घाबरून आरडाओरडा करु लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारीच असलेल्या गाई गोठ्यातून त्याचे वडील व चुलते धावत आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात त्यांची एक शेळी जागेवरच ठार झाली तर एक शेळी बिबट्या उचलून घेऊन नेऊन बाहेर लांब नेऊन ठार केल्याचे दीपक गांडाळ यांनी सांगितले. गांडाळ यांनी वनखात्याशी संपर्क करून हल्ल्याची माहिती दिली. वनकर्मचारी डी. डी. फापाळे आणि जे. टी. भंडलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी लहान मुलांना तसेच ग्रामस्थांना एकटे घराबाहेर जाऊ नये, अशा सूचना दिल्या.
आणे येथे बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST