शिरसगाव काटा : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील निंबोळी वस्तीनजीक असलेल्या ओढ्यातील पाण्यामध्ये बिबट्याची मादी रविवारी (दि. ३०) मृतावस्थेत आढळून आली.मिळालेल्या माहितीनुसार : वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील निंबोळी वस्तीनजीक राहणाऱ्या महिला रविवारी (दि. ३०) सकाळी जवळ असणाऱ्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या, त्या वेळी त्यांना त्या ठिकाणी ओढ्याच्या पाण्यात बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. या वेळी या महिलांनी घरी येऊन ही माहिती दिली. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. घटनेची माहिती कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की मृतावस्थेत आढळून आलेला बिबट्या हा मादी जातीचा असून सुमारे दीड वर्ष वयाचा आहे. या वेळी वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी आर. बी. वाव्हळ, एस. जे. पावणे, वनकर्मचारी डी. ए. चव्हाण, अभिजित सातपुते आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
बिबट्या आढळला मृतावस्थेत
By admin | Updated: May 3, 2017 01:54 IST