पिरंगुट : जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्याचे अस्तित्व आहे. मात्र शहराच्या जवळील पिरंगुट येथे स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला. बिबट्याचे अस्तित्व शहरी भागापर्यंत पोहोचल्याने या परिसरातील नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वनाधिकाऱ्यांनी या परिसाराची पाहणी केली असून पाऊलखुणा आढळल्या आहेत.पिरंगुट येथे मानववस्तीलगत असलेल्या स्मशानभूमीजवळ अनिल गरुड (रा. पिरंगुट) यांचे शेत आहे. याठिकाणी त्यांची बोअरवेल आहे. बुधवारी ते नेहमीप्रमाणे बोअरवेल चालू करण्यासाठी शेतात गेले असता त्याच दरम्यान त्यांना शेतात २ बिबटे दिसले. त्यांनी लगेचच फोन करून इतरांना बोलावले. मात्र, त्यांची चाहूल लागल्याने बिबट्याने पळ काढला. अनिल हे पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे बोअर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना १ बिबट्या झाडावर बसल्याचे दिसले. गरुड घाबरलेल्या अवस्थेत घरी आले व त्यांनी लगेचच गावचे पोलीस पाटील प्रकाश पवळे आणि वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली. वनविभागाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली. येथील ओढ्यालगत वनविभागाचे पिरंगुट वनरक्षक एन. आर. शेलार व पौड येथील वनपाल व्ही. डी. बाठे यांना बिबट्याच्या पाऊलखुणा व त्या परिसरात पडलेली विष्ठा आढळून आली. या पाऊलखुणा व विष्ठा पाहून त्या बिबट्याच्याच असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. वनविभागाचे अधिकारी व्ही. डी. भाटे यांना याबाबत विचारले असता, आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी गस्त घालायला सांगितले आहे. (वार्ताहर)
शहराच्या वेशीवर बिबट्या
By admin | Updated: January 14, 2017 02:52 IST