पौड : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून सुमारे १ टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे पाणी पाच नोव्हेंबरपर्यंत सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे. मुळशी तालुक्यासाठी राखीव असलेल्या साठ्यातून हे पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यालाच येत्या उन्हाळ्यात शेतीला पाणीटंचाईच्या झळा पोहोचू शकतात. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी पुणे जिल्ह्यातील धरणांतून उजनीत पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार टाटा पॉवर कंपनीच्या मुळशी धरणातून मुळशी तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या, शेतीच्या, अन्य वापरासाठीच्या पाणीसाठ्यातून हे एक टीएमसी (२६ दलघमी) पाणी सोडण्यात येणार आहे. मुळशी धरणात सध्या सुमारे ७० टक्के १३ टीएमसी (३७० दलघमी) पाणीसाठा आहे. टाटा पॉवर कंपनी व शासनात झालेल्या करारानुसार मुळशीतील जनतेसाठी १.२ टीएमसी (३४ दलघमी) पाणी राखीव ठेवण्यात येते; परंतु यंदा मुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे हे राखीव पाणी कमी करण्यात येऊ शकते. त्यानंतर मुळशीकरांसाठी किती पाणी उपलब्ध राहणार व पुन्हा नदीत पाणी सोडण्यात येईल किंवा नाही, याबाबत नागरिक साशंकता व्यक्त करीत आहेत.
मुळशीतून पाणी सोडणार
By admin | Updated: November 2, 2015 00:50 IST