पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, गणेशभक्तांना खूश करण्यासाठी टंचाई परिस्थितीतही अनंत चतुर्दशीच्या म्हणजे २७ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून एक दिवस पुणे शहराला पुरेल एवढे म्हणजे ०.०७ टीएमसी पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. दरम्यान,नागरिकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे नदीपात्रात विसर्जन करू नये, असे आवाहन बापट यांनी केले. पुण्याच्या गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी गुरुवारी बापट यांच्या अध्यक्षतेखाली येथील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसे गटनेते बाबू वागस्कर, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ उपस्थित होते. दर वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणांमधून पाणी सोडण्यात येते. परंतु यंदा पावसाने तब्बल अडीच महिने ओढ दिली. पावसाचे प्रमुख जून आणि जुलै हे दोन्ही महिने कोरडे गेले. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व धरणांमधील साठा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळेच पाणी सोडण्याचा निर्णय पावसावर अवलंबून असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले होते.विविध गणेश मंडळांकडून पाणी सोडण्याची जोरदार मागणी होत असल्याने बापट यांनी बैठक घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने शंभर विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत दर वर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला प्रकल्पातून ३६ तास सुमारे ०.१५ टीएमसी पाणी सोडण्यात येत होते. परंतु आता केवळ ०.०७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून, शनिवारी मध्यरात्री २ ते ३ च्या दरम्यान खडकवासला प्रकल्पातून मुळा-मुठात पाणी सोडण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ४नदीत सोडण्यात आलेले हे पाणी खराडी येथील मुंढवा जॅकवेल येथे अडवून प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे विसर्जनासाठी सोडलेले पाणी वाया जाणार नाही.४विसर्जनासाठी पाणी सोडण्यास शहरातील काही पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता.
विसर्जनासाठी पाणी सोडणार
By admin | Updated: September 25, 2015 01:43 IST