पुणे : महापालिकेचे आगामी २०१६-१७ चे अंदाजपत्रक तयार करण्यास आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून विलंब झाल्याने, त्यांनी दहा दिवसांची मुदतवाढ स्थायी समितीकडे मागून घेतली आहे. स्थायी समितीनेही त्या अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ घेतली असून, त्यामुळे अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सभेच्या सभासदांना दहा दिवसांचा कमी वेळ मिळणार आहे.महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत तयार करून, स्थायी समितीपुढे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर स्थायी समितीने १ फेब्रुवारीपर्यंत त्याला अंतिम स्वरूप दिले पाहिजे. त्याची छपाई होऊन ११ फेब्रुवारीपर्यंत मुख्य सभेच्या सभासदांपर्यंत त्याच्या प्रती पोहोचल्या पाहिजेत आणि २९ फेब्रुवारीच्या आत ते मुख्य सभेसमोर मांडले जाणे आवश्यक आहे; मात्र यंदा कुणाल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत परदेश दौऱ्यावर जात असल्याचे कारण पुढे करून, अंदाजपत्रक सादर करण्यास १० दिवसांची मुदतवाढ बुधवारी स्थायी समितीकडे केली; मात्र तुम्ही १६ जानेवारीपासून परदेश दौऱ्यावर जाणार असल्याने त्यापूर्वी नियमानुसार १५ जानेवारीला अंदाजपत्रक सादर करून जावे, असे समितीच्या सदस्यांनी स्पष्ट केले. त्या वेळी आयुक्तांकडून अंदाजपत्रकाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने १५ जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर करता येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना २५ जानेवारीपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. त्याचबरोबर स्थायी समितीला १ फेब्रुवारीऐवजी ११ फेब्रवारीपर्यंत अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करण्यासाठी मुदत वाढवून घेण्यात आली आहे. मुख्यसभेपुढे २९ फेब्रुवारीला अंदाजपत्रक मांडले गेल्यानंतर, त्यावरील चर्चा २० मार्चपूर्वी संपविण्याचे बंधन सभासदांवर आहे.
अंदाजपत्रकास आयुक्तांकडून उशीर
By admin | Updated: January 14, 2016 03:57 IST