पुणे : शहराच्या मेट्रो प्रकल्पाचा अनेक अडथळांच्या स्टेशनांवर थांबे घेत रखडलेला प्रवास अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या (पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड) पूर्वतयारी बैठकीपुढे (प्री-पीआयबी) या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी २३ जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांचा सततचे आक्षेप व राजकीय इच्छाशक्तीअभावी रखडलेली मेट्रो अखेर मान्यतेच्या शेवटच्या स्टेशनावर पोहोचली असल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये २५ जून रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या कामाला गती मिळाली आहे. मोदी यांच्याकडूनच मेट्रोच्या मंजुरीची घोषणा होईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यासाठी १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहराच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोसाठी प्री-पीआयबीची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचा ई-मेल केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून मंगळवारी महापौर कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. शहराच्या मेट्रो प्रकल्पावर विविध विभागांकडून अभिप्राय सूचना मागविण्यात आल्या आहेत. यावर सविस्तर चर्चा या बैठकीत केली जाईल. त्याचबरोबर, मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेला हजारो कोटी रुपयांचा खर्च कसा उभारला जाणार आहे, कोणत्या कंपनीकडून कर्ज घेतले जाणार आहे, याबाबतची वास्तविकता या वेळी पडताळून पाहली जाणार आहे. मेट्रोचा प्रकल्प जास्त खर्चिक होणार नाही ना, याबाबतही तज्ज्ञांकडून चर्चा केली जाईल.पुण्याच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रोला २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने तत्त्वत: मान्यता दिली होती. मात्र, केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर अचानक हा प्रकल्प रखडला. पुण्यानंतर नागपूर मेट्रोचा प्रस्ताव सादर होऊन त्याचे काम सुरूही झाल्याने पुणेकरांमध्ये नाराजी पसरली होती. शहराचे खासदार, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांना सातत्याने ‘पुण्याची मेट्रो केव्हा होणार?’ हा प्रश्न विचारला जात होता. अखेर मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर होऊन प्री-पीआयबीच्या बैठकीला मुहूर्त मिळाला आहे.प्री-पीआयबीमध्ये मेट्रोच्या प्रस्तावर चर्चा होऊन तो पीआयबीपुढे मांडला जाईल. पीआयबीच्या मान्यतेनंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळापुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला जाईल. मंत्रिमंडळाची मोहोर उमटल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. येत्या महिनाभरात मेट्रो मार्गी लागेल, असे आश्वासन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दोन दिवसांपूर्वीच दिले आहे. (प्रतिनिधी)
मेट्रो मान्यतेच्या शेवटच्या स्टेशनवर
By admin | Updated: June 22, 2016 01:15 IST