पुणे : नयना पुजारी खून खटल्याप्रकरणी बचाव पक्षाच्या वतीने घेण्यात येणारी साक्षीदारांची साक्ष सोमवारी संपली. या खटल्याची पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी होणार असून, सरकार आणि बचाव पक्षाचे अंतिम युक्तिवाद होणार आहेत. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ हर्षद निंबाळकर, तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. बी. ए. आलूर हे काम पाहत आहेत.बचाव पक्षाला न्यायालयाने २४ साक्षीदार तपासण्याची परवानगी दिली होती; परंतु त्यांपैकी १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली़ साक्षीदारांमध्ये आरोपी योगेश राऊतची आई आणि भावाचा समावेश होता. आरोपींवर दोषनिश्चिती झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने ३७ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. या खटल्यात दोन्ही बाजूंच्या साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली असून, बचाव पक्षाच्या वतीने सोमवारी साक्षी आणि पुरावे बंद झाल्याबाबत अर्ज देण्यात आला. खेड तालुक्यात ८ आॅक्टोबर २००९ रोजी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर जानेवारी २०१० मध्ये योगेश राऊत, विश्वास कदम, महेश ठाकूर आणि राजेश चौधरी या चार आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सात वर्षांपासून या खटल्याची सुनावणी सुरू असून आता ती अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ३ फेब्रुवारी रोजी होईल. (प्रतिनिधी)
पुजारी खून खटला अंतिम टप्प्यात
By admin | Updated: January 24, 2017 02:36 IST