कापूरव्होळ : परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावताना हस्त नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग दिला होता. आळंदे, संगमनेर, कासुर्डी, इंगवली, कापूरव्होळ, करंदी, निगडे, धांगवडी आदी गावांतून रब्बी पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.आधुनिक काळात शेतीसाठी विविध अत्याधुनिक यंत्रसामग्री व औजारांचा वापर होत असताना, बैलांच्या साह्याने शेतीसाठीची कामे मर्यादित राहिली आहेत, असे शेतकरी बोलू लागले आहेत. रब्बी हंगामात ट्रॅक्टरच्या मदतीने नांगरणी फनपाळी होत असल्याने बैलांच्या औताला मागणी कमी झाली असल्याने परिसरात ट्रॅक्टरची संख्या वाढून बैलांची संख्या कमी झाल्याचे परिसरातील शेतकरी बोलतात. वर्षभर बैलांचा वैरण व खाद्याचा खर्च शेतकऱ्याला अंगावर करावा लागत असल्याने बैलजोडीला फक्त पेरणीसाठीच व भात लावणीच्या काळात चिखल करण्यासाठी मागणी होत असते. त्यामुळे तरुण शेतकरी बैल सांभाळण्यास तयार होत नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सध्यातरी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे रब्बी हंगाम सुगीचा होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. करंदी खे.बा.चे बैलजोडी असणारे शेतकरी टेलरदादा बोरगे म्हणाले, की वर्षभरातून काहीच दिवसच बैलांन काम मिळत आहे. बाकी इतर दिवस बैलांचा खर्च अंगावर सोसावा लागत असल्याने पुढील हंगामात बैलांची विक्री करणार आहे. (वार्ताहर)
कापूरव्होळला पेरणी अंतिम टप्प्यात
By admin | Updated: November 2, 2015 00:55 IST