लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीमंत किंवा गरीब घरामध्ये नेहमी मुलगा हा वंशाचा दिवा असतो. त्याच घरात मुलगी ही वंशाचा दिवा का होऊ शकत नाही. जगात पुरुषांना सर्व सुख-सुविधा, सोई आहेत, त्यांना उच्च स्थान आहे. पण स्त्रियांना मात्र दुय्यम स्थान दिले जाते. असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केले. १ जुलै डॉक्टर दिनानिमित्त साईनाथ मंडळाने आयोजित केलेल्या पुण्यातील कर्तृत्ववान डॉक्टरांच्या गौरव सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. या वेळी डॉ. कल्पना बळीवंत, डॉ. सारिका जोशी, डॉ. गौरी दामले, डॉ. मुक्ता उमरजी, डॉ. पूनम शहा आदी सन्मानित डॉक्टर उपस्थित होते. या वेळी विद्या बाळ म्हणाल्या, आता समाजातील असुरक्षितता वाढत आहे, या काळात मुलींकडे लक्ष दिले पाहिजे. मुलींना शिकवले पाहिजे, त्यांना पुढे आणण्याची गरज आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार केला तर देशाचा मानवी स्रोत हा खरे तर स्त्रियाच आहेत. त्यांचा उपयोग करून घेतला तर देशाच्या समृद्धीसाठी नक्कीच फायदा होईल. विद्या बाळ यांच्या हस्ते सर्व महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला व मंडळाचे अध्यक्ष पीयूष शहा यांनी आभारप्रदर्शन केले.
वंशाचा दिवा नेहमी मुलगाच का?
By admin | Updated: July 2, 2017 03:23 IST