शिरूर : लाख रुपयांची बुलेट १० हजारांना, तर ५० ते ६० हजारांची मोटारसायकल पाच ते सात हजारांना विकणारा व घेणारा खूष! ज्यांच्या या मोटारसायकली आहेत ते मात्र दु:खी. असे का, तर हा प्रताप आहे मोटारसायकलचोरांचा. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केलेय या चोरट्यांना, दलालांना व विकत घेणाऱ्या टोळीला. चोरट्यांचे दलाल सोनसांगवी येथे राहत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, कर्मचारी विनोद काळे, मिलिंद देवरे, अनिल भुजबळ, राजू मोमीन व विनायक मोहिते यांच्या पथकाने सोनसांगवी येथे सापळा रचून प्रथम सुशील बबन डांगे व अक्षय शिवाजी डांगे यांना ताब्यात घेतले. या दोघांकडून उलगड झाला चोर, दलाल व चोरीच्या गाड्या घेणाऱ्या टोळीचा. सागर दौलत दैने (रा.वडगाव, ता.खेड) व ज्ञानेश्वर मधुकर खिलारी (रा. खिलारीवाडी, जुन्नर) हे दोघे मोटारसायकलला उचलायचे.या दोघांकडून दोन्ही डांगे मोटारसायकली घेऊन त्यांची विक्री करायचे असे या दोघा डांगे यांनीच पोलिसांना सांगितले.डांगे यांच्या जबाबानुसार पोलिसांनी दैने व खिलारी यांना अटक केली. पोलीस तपासात या मोटारसायकली जालिंदर देवराम सोनवणे (चाकण), पंकज उल्हास देशमुख (संगमनेर), यशवंत अनिल वेताळ (वरुडे) व विश्वास राघू डांगे यांना विकल्याचे निष्पन्न झाले. पोलीस तपासावेळी पाच हजार ते दहा हजारांना मोटारसायकली विकत असल्याचे आरोपींनी सांगितले. पुणे, चाकण, खेड व मंचर भागातून या मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी भगवानराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केल्याचे इंदलकर यांनी सांगितले.(वार्ताहर)अजूनही दुचाकी होणार हस्तगत पोलीस तपासात या मोटारसायकली चाकण, संगमनेर, वरुडे येथे विकल्याचे निष्पन्न झाले. या टोळीकडून १३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजूनही या टोळीकडून मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक इंदलकर यांनी वर्तवली.
लाखाची बुलेट १० हजारांत
By admin | Updated: June 8, 2015 05:04 IST