वानवडी : वादळी वाऱ्यासह जोरात झालेल्या गारपिटीच्या पावसामुळे गुरुवारी उंड्रीतील कडनगर भागातील हिल्स अँन्ड डिल्स इमारतीच्या समोरील रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे येथे तलावाचे स्वरूपच आले होते. त्यातून दुचाकी चालवणे कठीण झाले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी येथील पाण्याला योग्य वाट करून देण्याची मागणी केली आहे.
अनेक महिन्यांपासून येथील रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याला योग्य वाट करून दिलेली नाही. त्यामुळे येथे पाऊस पडला की, तलावच निर्माण होतो. गेल्या पावसाळ्यात तर येथील एक भिंतच कोसळली होती. त्यानंतरही महापालिका प्रशासन जागे झालेले नाही. त्यांनी अजूनही येथे काहीच काम केलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पावसाळा यायला अजून काही महिने असून, तोपर्यंत येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या रस्त्याची समस्या महापालिका अधिकाऱ्यांना अनेकदा सांगून झाली आहे. परंतु, ते काही दिवसांमध्ये काम पूर्ण करू, अशी उत्तरे देतात. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली, तरच प्रशासन जागे होणार आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्यातील पाण्यातून दुचाकी आणि चारचाकी नेल्यावर त्यात पाणी जात आहे. परिणामी वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाणही आहे. चिखलदेखील वाहनांमध्ये अडकतो आणि त्यामुळे वाहने खराब होत आहेत.
--------------
गुरूवार झालेल्या पावसात पाणी साचले आणि त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे. दुचाकी येथून नेताना मध्येच बंद पडतात. कारण दुचाकीच्या इंजिनमध्ये पाणी जाऊ शकते. महापालिकेने त्वरित ही समस्या सोडवायला हवी.
- राजेंद्र भिंताडे, स्थानिक नागरिक
----------------------
फोटो ओळी - कडनगर येथील रस्त्यात गुरुवारी झालेल्या पावसाने साचलेले पाणी.