पुणे : येरवडा परिसरातील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची जबाबदारी वनविभाग आणि महापालिका दोघांकडूनही झटकली जात असल्याने येथील वृक्षतोडीवर कोणाचा अंकुशच राहिला नाही. त्यामुळे पक्ष्यांचा निवारा हरविला असून, हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. डॉ. सलीम अली अभयारण्यातील झाडे अमानुषपणे तोडल्याने तिथे येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, दर पाच-सहा महिन्यांनी वृक्षतोड होते. क्लिन रिवर सोसायटीचे अध्यक्ष समीर निकम यांनी सांगितले की, उद्यान विभागाकडे तक्रार दिल्यावर अधिकारी फक्त पंचनामा करतात. पोलिसांत तक्रार नोंदवणे आवश्यक असतानाही कारवाई होत नाही. पूर्वी येथे ५० ते ६० पक्ष्यांचे थवे यायचे, पण नदीतील दूषित पाणी, वृक्षतोड अशा अनेक कारणांमुळे आता पक्षी पाहायला मिळत नाहीत, असे त्यांनी सांगितले.पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे म्हणाले, ‘‘अभयारण्याला वाचवायचे असेल तर महानगरपालिका व वनखात्याने एकत्र येऊन योग्य नियोजन करायले हवे. केवळ पैशांमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या कामासाठी निधीची गरज आहे. पक्षिप्रेमी, पक्षितज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढला तर नक्कीच सुधारणा होऊ शकतील.’’ वनखात्याच्या ताब्यात हे अभयारण्य असताना पक्षितज्ज्ञांना आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक होते. कोणत्या प्रकारचे पक्षी इथे येतात त्यांची माहिती व चित्रे फलकावर लावलेली असायची. तसेच २४ तास वनखात्याचा कर्मचारी असल्याने वृक्षतोड व्हायची नाही. (प्रतिनिधी)महानगरपालिकेने पक्षिनिरीक्षकांचा सल्ला घेऊन काम करावे. जंगलांमधील अनेक पक्षी या अभयारण्यात यायचे, पण आता त्यांचं प्रमाण कमी झालंय. हे अभयारण्य पूर्वी कसे होते आणि त्याचे आता काय झालंय, याबद्दलचा अहवाल व २५० पक्षिमित्र, पक्षितज्ज्ञ यांच्या सह्यांचे निवेदन आयुक्तांकडे देणार आहोत. -अनुज खरे (मानद वन्यजीवरक्षक)विविध पक्ष्यांना पाहता यावे, स्थलांतरित पक्ष्यांची ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही डॉ. सलीम अली अभयारण्यात जायचो. परंतु अनेक कारणांनी तेथील पक्ष्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. हे अभयारण्य काही प्रमाणात दुलर्क्षित झाल्याने येथे बाहेरून लोक दारूपिण्यास येतात. त्यामुळे असुरक्षितता वाढली आहे. जागा संरक्षित करण्याची गरज आहे.- हेमंत धाडनेकर (पक्षिप्रेमी)
पक्षी अभयारण्यावर कुऱ्हाड
By admin | Updated: January 21, 2015 00:39 IST