पिंपरी : कुदळवाडी-चिखली येथील भंगार मालाच्या आठ गोदामांना आग लागून सर्व साहित्य खाक झाले. ही घटना आज बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.कुदळवाडी येथील जाधववाडी परिसरात एकाच रांगेत भंगारमालाची तीस गोदाम आहेत. विविध प्रकारच्या भंगार मालासाठी हा परिसर शहरात प्रसिद्ध आहे. यापैकी एका गोदामाला सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. एकमेकाला लागून असलेल्या गोदामामुळे आग पसरून आठ गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.अरुंद जागेमुळे आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दलाच्या बंबांना घटनास्थळापर्यंत जाता आले नाही. केवळ एकच बंब आत जाऊ शकत असल्याने इतर बंबांना बाहेरच्या रस्त्यांवर उभे करण्यात आले. पाईपद्वारे पाणी आत नेण्यात आले. सर्व गोदाम एकाच मालकाचे असून ते भाड्याने दिलेले आहेत. आगीत गोदामातील प्लॅस्टिक, भंगार, लोखंडी स्पेअर पाटर््स खाक झाले. मागील बाजूस गोदामातील कामगारांच्या १४ झोपड्या होत्या. आग पसरुन त्या झोपड्यांतील साहित्य खाक झाले. प्रसंगावधान राखून झोपड्यातील गॅसचे सिलिंडर त्वरित बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. सहा बंब आणि सहा टँकरच्या साह्याने ४० जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. नागरिकांनीही आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी सुमारे दीड तासाचा कालावधी लागला.(प्रतिनिधी)
कुदळवाडीत आग; १४ झोपड्या खाक
By admin | Updated: November 6, 2014 00:35 IST