लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभूळवाडी येथील मराठेशाही हॉटेलजवळ एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून करून त्याचा मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, सासवडजवळील खळद येथे एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
आयान शेख (वय ६, रा. धानोरी) असे या मुलाचे नाव आहे. शेख याच्या नातेवाईकांनी मृतदेह ओळखला असून तो व त्यांची आई गेल्या दोन दिवसांपासून बाहेर गेल्याचे व त्यांचा पत्ता लागत नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले की, जांभूळवाडी गावाजवळ महामार्गाच्याकडेला एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केल्यावर डोक्यावरील जखमेमुळे अगोदर वाहनाने धडक दिल्याचा संशय आला. त्यावेळी मुलाचा शोध घेत त्याचे नातेवाईक आले होते. त्यामुळे मुलाची ओळख पटविण्यात यश आले. तपासणीत मुलाचा गळा आवळून खून केल्याचा निष्पन्न झाले. भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करीत आहेत. त्याचदरम्यान मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोटार आढळून आली असून त्या गाडीत रक्ताचे डाग असल्याचे समजते.
या माहितीची खात्री केली जात असतानाच पुरंदर तालुक्यातील सासवड ते जेजुरी रस्त्यावरील खळद गावाजवळील हॉटेल सूर्याच्या जवळ एका साधारण ३५ वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळाल्यावर सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. मुलाचा खून करून मृतदेह घाटात टाकून देणे आणि महिलेचा मृतदेह खळदजवळ आढळून येणे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का, हे दोन्ही मृतदेह आई- मुलाचे आहेत का, हे पोलीस तपासून पहात आहेत.