पिंपरी : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी किवळेतील हॉटेल व्यवस्थापकावर गोळीबार केला. त्यात विनायक दत्तोबा शिंदे (वय ३७, रा. हॉटेल शिवनेरी, किवळे, मूळगाव- भोर) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. गोळीबाराचे निश्चित कारण समजू शकले नाही. देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे हद्दीत हॉटेल शिवनेरी आहे. तिथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास तिघे जण दुचाकीवरून आले होते. त्यांनी व्यवस्थापक शिंदे यांना हॉटेलच्या बाहेर बोलावून घेतले. शिंदे बाहेर आल्यावर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्यामुळे शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हॉटेलमधील कर्मचार्यांनी शिंदे यांना थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हल्लेखोर मुंबईच्या दिशेने पळून गेले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून तीन दिवसांपूर्वीच वाद झाला होता. शाब्दिक बाचाबाची, भांडण झाले होते. त्या कारणातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. शिंदे यांच्या छातीत दोन गोळ्या घुसल्या असून, ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
किवळेत गोळीबारात हॉटेल व्यवस्थापक ठार
By admin | Updated: May 24, 2014 05:02 IST