वारजे : शिवणे येथील बांधकाम साईटवर काम करीत असलेल्या महिलेच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून ओरिसा येथे पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना वारजे पोलिसांनी चार तासांत पकडले. बाळ सुखरुपपणे आईच्या कुशीत दिले.कविता किशोर मोहिते यांच्या सहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. त्या एका बांधकामावर बिगारी म्हणून काम करत होत्या. सुजाता अमर जिया (वय २०, रा. नांदेड गाव, सिंहगड रस्ता), तिचा पती अमर कुमार तराई (वय २५) या दोघांना अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन युवतीलाही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर उत्तम मोहिते (वय २६, रा. नवभारत स्कूलशेजारी, शिवणे, मूळ निफाड, नाशिक), पत्नी कवितासह एका बांधकामावर बिगारी म्हणून काम करीत होते. बांधकामाच्या मागेच झोपडी बांधून राहात होते. सोमवारी सकाळी त्या बांधकामावर इमारतीच्या सीमा भिंतीचे काम करीत असताना पार्किंग मध्ये साडीची झोळी करून त्यात त्यांनी त्यांच्या बाळाला- दीपक (वय ६ महिने) झोपविले होते.सकाळी साडेदहाच्या सुमारास कविता पाणी पिण्यासाठी झोपडीत गेल्या. परतल्यावर त्यांना बाळ दिसले नाही. आसपास शोधाशोध केल्यावर कोणीतरी पळविल्याची खात्री झाल्यावार त्यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संबंधित वृत्त पान ७ वर
बाळाचे अपहरण करणा-यांना ४ तासांत पकडले
By admin | Updated: February 24, 2015 01:31 IST