बारामती (वार्ताहर) : पुणे जिल्हा परिषदेच्या आणि बारामती पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या उमेदवाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी धावपळ केली. मतांची गोळाबेरीज करण्यात अडचण आणणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, सुनील भगत यांनी आपला उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यंदा प्रथमच भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्व जागांवर तगडे उमेदवार दिले आहेत. काही ठिकाणी शिवसेना, रासपसह बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवारदेखील रिंगणात राहिल्याने निवडणूक लक्षवेधी ठरेल. ६ पैकी ५ गटांच्या उमेदवारांची माघारीची मुदत आज संपली. आज जिल्हा परिषद निवडणूक गटासाठी ३९ अर्ज तर पंचायत समिती गणासाठी ५५ जणांनी अर्ज माघार घेतले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) शंकरराव जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील यांनी दिली. अडचणीचे ठरणारे अपक्ष, बंडखोर उमेदवारांची मनधरणी कालपासूनच प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी खुद्द उमेदवारांनी देखील हस्ते परहस्ते करण्यास सुरुवात केली होती. आज दुपारी ३ ची वेळ गाठण्यासाठी कार्यकर्ते जुंपले होते. महत्त्वाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रमुख उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
खोमणे यांची बंडखोरी मावळली
By admin | Updated: February 14, 2017 01:44 IST