पुणे : खेडमधील स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी (एसईझेड) शेतकऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आलेल्या जमिनींपैकी कराराप्रमाणे १५ टक्के जमीन विकसित करून परत द्यावी किंवा बाजाराभावानुसार तिचा मोबदला द्यावा, या मागणीसाठी सोमवारी शेतकऱ्यांनी वाकडेवाडी येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी यावर १८ एप्रिलला बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. खेडमध्ये एसईझेड उभारण्यासाठी तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सध्या या जमिनीचा ताबा खेड इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (केईआयपीएल) कंपनीकडे आहे. या जागा ताब्यात घेताना शेतकऱ्यांशी करार करण्यात आला. त्यानुसार, शेतकऱ्यांना १५ टक्के जमीन विकसित करून परत द्यायची आहे; मात्र ती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांनी आज हे आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन भजन केले व घोषणा दिल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण-पाटील, चेतन शेट्टी, डॉ. बाळासाहेब माशेरे, विष्णू गोरड, काशिनाथ हजारे, काशिनाथ दौंडकर, जे. पी. परदेशी आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
‘खेड सेझ’चा पेच सुटेना!
By admin | Updated: April 5, 2016 00:57 IST