आसखेड : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे मुख्य पीक असून यंदाही पावसाच्या अवेळी व लहरीपणामुळे त्याला फटका बसला. शेतभात जोमदार आले असले तरी खाचर भातावर मोठा परिणाम दिसत आहे.करंजविहिरे, शिवे, वाहगाव, देशमुखवाडी गडद, वांद्रा, शेलू, आसखेड व परिसरातील गावांत भाताचे मुख्य पीक असते. पाऊस व हवामानाच्या लहरीपणामुळे येथील भात उत्पादक नेहमीच अडचणीतच असतो. पश्चिम पट्ट्यात भातपिकात विशेषत: कोलम, अंबेमोहर, इंद्रायणी, बासमती या प्रकारची भातलागवड करण्यात येते; परंतु यंदा पाऊस उशिरा आल्याने भात लागवडी उशिरा कराव्या लागल्या. खाचरात पाण्याअभावी लागवड वेळेत करता आली नाही. भातलागवडीवर, भाताच्या विविध जाती यावर योग्य मार्गदर्शक कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकांवर विविध योजना व सवलती देणे व कार्यशाळांचे नियोजन करायला पाहिजे, असे मत शिवे येथील भातशेतकरी शांताराम शिवेकर यांनी व्यक्त केले. पावसाचा लहरीपणा, सततचे धुके, किड, विजेचा लपंडाव अशा अनेक संकटांस तोंड देऊन हजारो रुपये खर्चून शेतकरी भात पिकवतात. ााउलट पेरभात करणारे शेतकरी मात्र थोडेफार पाणी देऊन बऱ्याचदा चांगले उत्पादन घेत असतात. ज्या ज्या वेळी शासनाने दुष्काळ जाहीर केला त्या वेळी भात शेतकरी दुर्लक्षितच राहिला आहे, तर मग शासन कोणता सूड भातपिक शेतकऱ्यांवर उगवत आहे? असा सवाल निर्माण होत आहे. (वार्ताहर)
खाचर भातपिकाला फटका
By admin | Updated: October 31, 2015 01:11 IST