पुणे : जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार २७८ हेक्टर आहे. यंदा २ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर मुख्य पिकांच्या पेरणीचे नियोजन केले आहे.
यंदा सोयाबिन-मक्याचा पेरा वाढण्याची अपेक्षा आहे. या दृष्टीने एकूण बियाणे मागणी २८ हजार ८६ क्विंटल केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले.
महाबीज व खासगी वितरकांकडून २२ हजार ७२१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात तृणधान्य पिकांमध्ये भात पिकासाठी १२ हजार ६८८ क्विंटल बियाणे मागणी आहे. प्रत्यक्षात १३ हजार ९३७ म्हणजे ११० टक्के बियाणे पुरवठा झाला आहे. वेल्हा, मावळ, मुळशी, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यांत भात रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
नियोजित क्षेत्रासाठी एकूण २ लाख १४ हजार ८०० मेट्रिक टन खताची आवश्यकता आहे. उपलब्धता १ लाख ३८ हजार ९८४ टनांची असल्याचे बोटे म्हणाले. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरापेक्षा महाग दराने खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनीही अशा विक्रेत्याच्या विरोधात त्वरीत खत विक्री नियंत्रण कक्षाबरोबर ९४०४९६३९६४, ०२०-२५५३७७१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.