शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती-प्रसूत महिलांना पाणी टंचाईच्या कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:15 IST

कमला नेहरू रुग्णालयातली दुरवस्था : स्वच्छतागृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून होते हकालपट्टी लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या ...

कमला नेहरू रुग्णालयातली दुरवस्था : स्वच्छतागृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून होते हकालपट्टी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या असंवेदनशील कारभारामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीच येत नसल्याने या महिलांची कुचंबणा होत आहे. दुसऱ्या वॉर्डातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी जावे, तर या महिलांना तेथील नर्स आणि डॉक्टर हाकलवून लावत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या रुग्णालयातील व्यवस्था सुधारण्यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मागणी केली आहे. परंतु, आरोग्य विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या आठवड्याभरापासून कमला नेहरू रुग्णालयातील रुग्णांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासन याची साधी दखलही घेत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले आहेत.

याठिकाणी प्रसुतीकरिता दाखल झालेल्या एका महिलेच्या बहिणीने याबाबत ‘लोकमत’कडे कैफियत मांडली. या महिलेची बहीण प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर तिचे सिझेरियन झाले. दोन-तीन दिवसांची ही ओली बाळंतिण स्वच्छतागृहात गेली असता, तेथे पाणी नव्हते. त्यामुळे ती १० नंबर वॉर्डमध्ये गेली. परंतु, तेथे कुलूप लावण्यात आलेले होते. दुसऱ्या एका वॉर्डमध्ये गेल्यावर तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या महिलेला तेथून हाकलून लावले. ‘तुमच्या वॉर्डात स्वच्छतागृह आहे, त्याचाच वापर करा. अन्य वॉर्डात येऊ नका.’ असे म्हणत परत पाठवून दिले. या महिलेला चौथ्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहापर्यंत चढून जावे लागले.

असाच अनुभव नुकत्याच दाखल झालेल्या आणखी एका गरोदर महिलेला आला. ही महिला अद्याप प्रसूत झालेली नसली, तरी तिचे दिवस भरलेले आहेत. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते. परंतु, या अवघडलेल्या अवस्थेतील महिलांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून असंवेदनशीलतेची वागणूक दिली जात आहे. महिला व अन्य रुग्णांना स्वच्छतागृहासह अंघोळीसाठी पाणी नसल्याने नातेवाईक आरडाओरडा करीत आहेत. परंतु, त्यांच्या उद्विगनतेकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी आल्याचे सांगितले जाते. मात्र पर्यायी व्यवस्था कोण उपलब्ध करून देणार, यावर कोणीच बोलायला तयार नाही.