पुणे : टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तशी मागणी केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही टाटाचे पाणी राखीव ठेवा, असा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.पुणे विभागात सर्वाधिक पाणीसाठा सध्या टाटा कंपनीची खासगी मालकी असलेल्या मुळशी धरणात शिल्लक आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती करून मुंबईला पुरविली जाते. २देशपातळीवर सध्या वीज अतिरिक्त असल्याने ‘नॅशनल ग्रीड’मधून आणणे शक्य आहे. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि मराठवाड्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पाणी राखीव ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेच टाटा कंपनीकडे असलेल्या मुळशी, वळवण या धरणांचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, असा विषय ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला होता.आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर सकारात्म चर्चा झाली. सभेच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात काय स्थिती आहे, याची मांडणी करण्यात आली. त्यानंतर त्या त्या तालुक्यातील सदस्यांनी तेथील चित्र मांडले. यात टाटाच्या मुळशी धरणातील १५ टीएमसी पाणी राखीव ठेवले, तर जिल्ह्याची भविष्यातील पाणीटंचाई दूर होईल, असा विषय सदस्यांनी मांडला. याला सर्वांनी अनुमती देऊन तसा ठराव करून, तो पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जाहीर केले. त्यानंतर कार्यकारी अभियंता वि. भा. जाधव यांनी मुळशी धरणातून १.२ टीएमसी पाणी आपण वापरू शकतो. ही चर्चा मी वरिष्ठांच्या कानावर घालतो, असे सांगितले. या सभेत उजनी धरणातही -0.९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणीही राखीव ठेवा, अशी मागणी सदस्यांनी केली. सर्व चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी लवकरच जिल्हा परिषद दुष्काळी दौरे करणार असून, यात निदर्शनास आलेल्या परिस्थितीनुसार उपाययोजना करेल, असे जाहीर केले. (प्रतिनिधी)
‘मुळशी’चे पाणी राखीव ठेवा
By admin | Updated: September 5, 2015 03:27 IST