पिंपरी : नोकरीवरून काढल्याच्या रागातून एका कामगाराने बालाजी भानुदास बिरादार (वय ३२, रा. वैभव कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) या व्यवस्थापकाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. काळेवाडी येथील विजयनगर येथे शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी दत्ता आमले (वय २०, रा. टाकवे बुद्रुक, कान्हे फाटा, वडगाव मावळ) या आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक केली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी : बिरादार कान्हे फाटा येथील बेरॉक नावाच्या कंपनीत उत्पादन व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडेच दत्ता आमले काम करीत होता. येथे बिरादार आणि आमले यांच्यात काही कारणावरून भांडण झाले. याबाबत बिरादार यांनी कंपनी प्रशासनाकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर कंपनीने दत्ताला कामावरून काढून टाकले. यावरूनच दत्ताला बिरादार यांच्यावर राग होता. काही दिवसांपूर्वी त्याने बालाजी यांना कंपनीच्या गेटवर बोलावून त्यांना मारहाण केली होती. बालाजी यांनी याबाबत तक्रार दिली होती, याचाही दत्ताच्या मनात राग होता. वारंवार बालाजी यांना फोन करून शिवीगाळ व धमकी देत असे. शनिवारी हल्ला केला. (प्रतिनिधी)
काळेवाडीत खून; एकास अटक
By admin | Updated: May 25, 2015 05:53 IST