पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान राज्यात २१७ सापळे रचून लाचखोरांना पकडले. बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून ९ गुन्हे दाखल केले. केवळ २ महिन्यांत २१ महिला लोकसेवकांवर कारवाई झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच काळापेक्षा यंदा ३६ अधिक सापळे रचण्यात आले असून, सापळावाढीचे प्रमाण ४८ टक्के आहे. सापळा रचल्यानंतर आरोपींकडून ४९ लाख २१ हजार रुपयांची मालमत्ता जप्त झाली असून, बेहिशेबी संपत्तीची रक्कम २ कोटी ३७ लाख ८३ रुपये आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विजयकुमार भोईटे यांनी सांगितले, की या वर्षी सापळ्यांमध्ये सापडलेल्यांत सर्वाधिक ६९ जण महसूल विभागातील, ५४ पोलीस दल व गृहविभागातील, ३३ ग्रामविकास तर २३ नगरविकास विभागातील आहेत. विद्युत मंडळाचे १८, आरोग्य विभागाचे १०, शिक्षण विभागातील ८ जण सापळ्यांमध्ये अडकले असून, वन विभागाचे १२ जण, सहकार व पणन विभागातील ६ जण तर पाटबंधारे विभागातील दोन जण कारवाईत सापडले आहेत. सभापती व नगराध्यक्ष, महापौर, सरपंच, वकील, डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, तलाठी अशांचा यामध्ये समावेश आहे. ३१ जणांनी याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. या वर्षीच्या कारवाईत अपराधसिद्धीचे प्रमाण २३ टक्के आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ३२५९ प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत.
लाचलुचपतचे फक्त दोन महिन्यांत २१७ सापळे
By admin | Updated: March 4, 2015 00:29 IST