रांजणगाव गणपती : गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कवी भरत दौंडकर यांना 'श्याम' आणि त्यांची आई कलाबाई यांना 'श्यामची आई' हा सन्मान अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सुरेश पठारे, लाभेश औटी, कनिफ गव्हाणे, विजय करपे, संतोष विधाटे, कांतीलाल टाकळकर, राजेंद्र चव्हाण, तेजस यादव तसेच निमगाव म्हाळुंगीतील शेतकरी उपस्थित होते.
पतीच्या अकाली निधनानंतर दगडाच्या खाणीत कष्ट करून आपल्या चार अपत्यांचे संगोपन करणाऱ्या 'श्यामची आई' सन्मानप्राप्त कलाबाई दौंडकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषद - भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या; तर भरत दौंडकर यांनी सत्काराला उत्तर देताना, याची देही, याची डोळा आईचा सन्मान पाहण्याचे भाग्य लाभले. खरं म्हणजे आईची कविता लिहिता येत नाही; परंतु आईमुळे जीवनात बारा हत्तींचे बळ मिळाले, अशा भावना व्यक्त केल्या.
अण्णा हजारे पुढे म्हणाले की, संस्कार केंद्रांपेक्षाही मुलांवर खरे संस्कार आईकडून होतात; कारण आई आपल्या प्रत्येक कृतीतून मुलांना शिकवत असते. आचारशुद्धता, विचारशुद्धता, त्याग, सहनशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही मानवी जीवनाची पंचसूत्री असावी. प्रपंच सर्वच करतात; पण देशाचा प्रपंच करायला शिका; कारण प्रपंच जेवढा मोठा तेवढा जीवनातील आनंद मोठा असतो.
या प्रसंगी जी. के. औटी यांना सानेगुरुजी विचारसाधना पुरस्काराने तसेच महाराष्ट्रातील गुणवंत कामगारांना सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्वागत केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरुण गराडे यांनी मानले.
१९ रांजणगाव गणपती
कलाबाई दौंडकर व कवी भरत दौंडकर यांना अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.