लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यातील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. जयंत पाटील हे शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादाच्या चर्चेत काहीच तथ्य नाही, असं सांगत अजित पवार यांनी पाटील-कुंटे वादावर पडदा टाकला.
अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. पवार म्हणाले, जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत. उलट मीच तापट स्वभावाचा आहे. जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे.
--
अजित पवारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
अनेक सामाजिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्यासाठी अजित पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. या धनादेशची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन पवार यांनी संबंधितांना पावती आणि आभार मानणारे पत्र देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एक दिव्यांग कार्यकर्ता पुढे आला आणि त्याने अजित पवारांच्या हातामध्ये एक धनादेश ठेवला.
धनादेश लंकेंपर्यंत पोहोचवण्यासाठी सूचना
धनादेशवर नाव होतं नीलेश लंके फाउंडेशन, तर मदत होती २१०० रुपयांची. ही बाब लक्षात आल्यानंतर नीलेश लंके यांना हा धनादेश कसा पोहोचेल, त्यांचे कोणी कार्यकर्ते पुण्यात असतील तर त्यांना निरोप देण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. तसेच लागलीच राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना फोन केला आणि तुझं काम चांगलं चालू आहे, असं म्हणत शुभेच्छा दिल्या.