पुणे : पालिकेच्या टँकरचालकांकडून बांधकाम व्यावसायिकांकडे टँकर खाली करणे, हद्दीबाहेर पाण्याची विक्री करणे, सांगितलेल्या ठिकाणांपेक्षा दुसरीकडेच जाणे आदी प्रकारच्या होत असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व टँकर मालकांनी त्यांच्याकडील सर्व टँकरना जीपीआरएस यंत्रणा बसवून घेण्याचे आदेश पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पाणीटंचाई असलेल्या भागात पालिकेच्या वतीने सवलतीच्या दरात टँकरचालकांना पाणी उपलब्ध करून देण्यात येते. मात्र, या पाण्याचा टँकरचालक गैरवापर करीत असल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या. बांधकाम व्यावसायिकांना, तसेच शहराच्या हद्दीबाहेर जादा दरात टँकर विकणे आदी प्रकार घडत असल्याचे उजेडात आले होते. पालिका प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षीच खासगी टॅँकरना जीपीआरएस बसविण्याचा निर्णय घेतला होता; मात्र टँकरचालकांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. या वेळी कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करायची, असा निर्धार प्रशासनाने केला असून, त्यादिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. टँकरचालकांना त्याकरिता एक महिन्याची मुदत देण्यात आली असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवैध टॅँकरना बसणार चाप
By admin | Updated: February 5, 2015 00:29 IST