पिंपरी : तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाइनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता व नागरिकही उत्स्फूर्तपणे विविध तक्रारी करत होते. मात्र, यावरील तक्रारी सोडविल्या जात नाहीत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी नागरिकांना सेवा-सुविधा वेळेवर मिळाव्यात, यासाठी सारथी हेल्पलाइन सुरू केली होती. त्यावर येणाऱ्या तक्रारी तातडीने सोडविल्या जात असल्याने पारदर्शक कारभाराचा अनुभव शहरवासीयांना येत होता. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व लोकप्रतिनिधींवर त्यांचा अंकुश राहत होता. सारथीवर करण्यात आलेल्या तक्रारींचे योग्य निराकरण होत होते. मात्र, परदेशी यांची बदली झाल्यानंतर मुजोर कामचुकार व भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा रान मोकळे झाले असून, मुजोरी खूपच वाढली आहे. गेल्या काही वर्षांत मी सारथीवर दोनपेक्षा जास्त तक्रारी विविध नागरी समस्यांसाठी केल्या, परंतु निम्म्यापेक्षा अधिक तक्रारींची दखल न घेता काम पंधरा दिवसांत, महिनाभरात होईल, अशी कारणे दिली जात आहेत. स्पीडब्रेकरबाबतही अनेक तक्रारी नागरिकांना केल्या आहेत. बेकायदेशीरपणे उभारलेल्या स्पीडब्रेकर्समुळे आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक जण जखमी झाले आहेत. त्याबद्दल संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई होणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)
तक्रारीची घेइनात दखल
By admin | Updated: November 14, 2016 02:45 IST