पुणे : कर्तव्यात कसूर, गुन्ह्याच्या घटनास्थळावर वेळेत न पोचणे, तपासातील हलगर्जीपणा तसेच नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे पोलीस ठाण्यांचे निरीक्षक चांगलेच धास्तावले आहेत. तात्पुरत्या हा होईना परंतु ‘नियंत्रण कक्षा’मध्ये होणाऱ्या बदल्यांमुळे ‘उद्योगी’ पोलीस निरीक्षकांच्या मनमानी कारभाराला चाप लागणार आहे.दुचाकीस्वार तरुणांच्या टोळीने शनिवारी पहाटे डेक्कन परिसरात दरोडा टाकल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नसलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रवीण चौगुले यांची सहआयुक्तांनी नियंत्रण कक्षात तात्पुरती बदली केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षाराणी पाटील यांनाही स्थानिकांच्या तक्रारींवरून नियंत्रण कक्षामध्ये संलग्न करण्यात आले होते. यासोबतच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, कोथरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) दिनकर कदम, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कोळी यांनाही तडकाफडकी नियंत्रण कक्षामध्ये बदलण्यात आले होते. गेल्याच महिन्यात डेक्कन विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त अरविंद पाटील यांना नियंत्रण कक्षामध्ये संलग्न करण्यात आले होते. यातील कदम यांना गुन्हेगारांबाबतची माहिती नीट देता आली नाही म्हणून, कोळी यांना हद्दीतील बिघडलेली कायदा सुव्यवस्था यावरून नियंत्रण कक्षामध्ये बदलण्यात आले होते. कर्तव्यात कसूर केल्यास बदलीला सामोरे जावे लागेल, याची जाणीव निरीक्षकांना करून देण्याच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे निरीक्षक धास्तावले आहेत. याचा परिणाम आगामी काळात गुन्ह्यांच्या तपासावर होण्याची शक्यता असून, पोलीस ठाण्यांचे संतुलन बिघडण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारवाई योग्य आणि खरोखरीच कसूर झाली असेल तर कारवाई करा; परंतु किरकोळ कारणांवरून कारवाई होणे गैर असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
हलगर्जीमुळे निरीक्षकांना ‘नियंत्रण कक्ष’
By admin | Updated: July 13, 2015 03:52 IST