पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपीएमएल)मधील भरतीबाबत झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणाचा सायबर गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. पीएमपीमधील भरतीमध्ये जाहिरात देऊन तरुणांची फसवणूक केल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांनी विचारला होता. या जाहिरातीच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकाने अर्ज भरल्याबाबत, परीक्षा शुल्क जमा केल्याबाबत आणि त्यातून फसवणूक झाल्याची लेखी अथवा तोंडी तक्रार परिवहन महामंडळाकडे केलेली नाही. या प्रकरणात महामंडळाने सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली असून, अधिक तपास सुरू आहे. भरतीबाबत नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून परिवहन महामंडळामार्फत कोणतीही भरती प्रक्रिया सुरु नसल्याचा खुलासा केला आहे.
पीएमपीच्या आॅनलाईन भरती जाहिरात प्रकरणाची चौकशी सुरू
By admin | Updated: March 23, 2016 01:33 IST