प्रशांत ननवरे, बारामतीसोशल मीडियामध्ये रमणाऱ्या आजच्या युवा पिढीसमोर बारामती शहरातील युवकांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्या या युवकांचा खारीचा वाटा अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. त्यांच्याच पुढाकारातून बारामती शहर परिसरातील पहिला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गतचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, अंधश्रद्धेतून झालेल्या अन्यायाला वाचा फुटून एका सामान्य कुटुंबाचे आयुष्य सावरले आहे.विपुल पाटील, योगेश पाटील, अनिल गायकवाड, विजय रसाळ, सागर रोकडे, महादेव कदम, राधेश्याम गोसावी अशी या युवकांची नावे आहेत. शालेय जीवनापासूनच या युवकांवर नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. याच विचारांनी प्रेरित होऊन दाभोलकर यांच्या हत्येनंतर देखील त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य सुरूच ठेवले आहे. कारखेल (ता. बारामती) येथील भापकरवस्ती येथे भापकर कुटुंबाला मांत्रिकाच्या सांगण्यावरून वाळीत टाकण्यात आले होते. या कुटुंबाची मांत्रिकाने अंधश्रद्धेतून आर्थिक फसवणूक केली होती. ही फसवणूक उघड झाल्याने त्यांना मांत्रिकाच्या सांगण्याने शेजाऱ्यांनी वाळीत टाकले. अंनिसच्या या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. बारामती शहरातील एका हॉटेलमध्ये ‘बाबा ब्रह्मचारी बनारसवाले’ नावाने ज्योतिषी उतरला होता. ब्रह्मचारी असून हनुमानभक्त असल्याचा या ज्योतिषाने प्रचार केला होता. भविष्य पाहण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मनातील केंद्रिकरण पद्धतीने विचार ओळखून त्यांच्यावर तो प्रभाव पाडत असे. दिवसाला २५ ते ३० हजारांची लूट हा कथीत ज्योतिषी करीत होता. विपुल पाटील यांच्यासह अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या शिष्याकडून त्याची माहिती काढून पोलीस तक्रारीचा इशारा दिला. त्या ज्योतिषाने तत्काळ शरणागती पत्करून पोबारा केला.
युवकांचा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पुढाकार
By admin | Updated: January 11, 2015 23:51 IST