बारामती : सराईत गुन्हेगारांसह राजकीय गुन्हे दाखल झालेल्यांची मागील १५ वर्षांतील माहिती फक्त एका ‘क्लिक’वर मिळण्याची सोय बारामती शहर पोलिसांनी केली आहे. पारपत्रासह अन्य महत्त्वाच्या कामासाठी पोलिसांचा दाखला आवश्यक असतो. त्यामुळे किरकोळ गुन्ह्यासह सतत तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्यांचे ‘रेकॉर्ड’च तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३६ पोलीस ठाण्यापैकी फक्त बारामती शहर पोलीस ठाण्याने २००१ पासूनचे ‘रेकॉर्ड’च तयार केले आहे. शहरातील तीनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या आरोपींसह, मोर्चे, आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झालेल्यांचे रेकॉर्डदेखील करण्यात आले आहे. या रेकॉर्डच्या अनुषंगाने निवडणुकीच्या काळात सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणे शक्य होते. तीनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारांची संख्यादेखील बऱ्यापैकी आहे. चोरी, खून, घरफोडी, जबरी चोरी, वाटमारीतील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली आहे. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्ह्यांसह अन्य पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल गुन्ह्याची नोंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, गुन्हे विभागाचे एस. एम. तावरे यांनी दिली.
एका ‘क्लिक’वर मिळणार गुन्हेगारांची इत्थंभूत माहिती
By admin | Updated: September 13, 2015 00:55 IST