राजेगाव : हवामानाच्या लहरीपणामुळे वातावरणात कमालीची विसंगती दिसून येत आहे. दिवसभर वाढत चाललेले ऊन आणि रात्रीचा गारठा अशाप्रकारच्या अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. मागील महिन्यात अचानक वाढलेली थंडी व कमी जास्त होणाऱ्या उन्हाचा शेतपिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. राजेगाव परिसरात ऊस, गहू, हरभरा, कांदा, तरकारी या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतित आहे. तसेच या अनियमित वातावरणामुळे पशुधनावर प्रतिकूल परिणाम होण्याची चिंता दुग्धउत्पादक शेतकरी करीत आहेत. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे आणि जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली महागाई यामुळे अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने अडचणीत आलेला आहे. पिके वाचवण्यासाठी त्याची धडपड चालू असून, प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या किमतीत दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाट वाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.या वर्षी केलेल्या आडसाली उसाच्या पानांवर काळा व पांढरा लोकरी मावा पडल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. थंडीच्या हंगामात ऊस पिकांवर लोकरी मावा पडतो. त्यामुळे थंडीचे दिवस असल्याने ऊस पिकांवर पांढरा लोकरी मावा पडलेला आहे. पानांवर पडलेल्या लोकरी माव्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रिया थांबल्याने पिकांची वाढ खुंटून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शेतमालाच्या पडलेल्या बाजारभावामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी लोकरी माव्याने आक्रमण केल्याने धास्तावला आहे.
उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव
By admin | Updated: February 10, 2017 02:52 IST