आनेवाडी आणि खेड शिवापूर टोल: संशयितांना जामीन मंजूर
भोर :
वाई, आणेवाडी आणि खेड-शिवापूर टोलनाक्यावरील बनावट पावत्यांच्या गुन्ह्यात अटक केलेल्या सर्व संशयितांना पुराव्याअभावी शिवाजीनगर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
पुणे-सातारा महामार्गावर आणेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर टोल वसुलीसाठी बनावट पावतीद्वारे पैसे जमा केले जात असल्याची तक्रार पुणे येथील अभिजित वसंत बाबर यांनी दिली होती. यानंतर पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणेवाडी व खेड-शिवापूर टोल नाक्यावर पंचांच्या समक्ष या प्रकरणाची माहिती घेत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये टोल नाक्यावर पावत्या बनावट असल्याचे सांगत पोलिसांनी याप्रकरणी सुरेश प्रकाश गंगावणे (वय २५, रा.धोम कॉलनी वाई), अक्षय तानाजी सणस (वय २२, नागेवाडी, ता. वाई), शुभम सीताराम डोलारे (२१, जनता वसाहत वाई ), साई लादूराम सुतार (२५, रा. दत्तनगर, कात्रज) हेमंत भाटे, दादा दळवी
सतीश मारगजे आदींना पोलिसांनी अटक केली होती.
याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांच्या जामीन अर्जावर पुणे येथील शिवाजीनगर एम. पी. परदेशी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या गुन्ह्यात अटक केलेल्या सर्व संशयितांना पुराव्याअभावी शिवाजीनगर न्यायालयाने आज जामीन दिला संशयितांच्या वतीने ॲड. विशाल वाडकर यांनी काम पाहिले.