पिंपरी : वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाला सहज नमवीत, सलग दुसरा विजय मिळवीत भारतीय संघाने घोडदौड कायम ठेवली. त्यामुळे संघाकडून रसिकांच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी रविवारी नागरिकांनी सहपरिवार क्रिकेट पाहण्याचा आनंद घेतला. विजय दृष्टिक्षेपात आल्यानंतर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागरिक मिळेल त्या ठिकाणी टीव्हीवर लढत पाहत होते. गेल्या रविवारी प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला पराभूत करीत भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये दमदार सुरुवात केली. संघाचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका संघाच्या विरोधात रविवारी सकाळी नऊला सुरू झाला. रविवार साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी निवांतपणे उठण्याचा बेत रद्द करून घरातील सर्वच मंडळींनी टीव्ही संचासमोर ठाण मांडली. बालकापासून वृद्धांपर्यंत सर्वच मंडळी टीव्हीसमोर होते. सामना बघतच सकाळचा नाश्ता घेतला गेला. भारतीय संघाच्या धुवाधार फलंदाजीचा आनंद घेतला. धवनच्या १३७ धावांच्या शतकी फलंदाजीने संघाची विजयाची बाजू अधिक भक्कम केली. (प्रतिनिधी)
भारताच्या विजयाने जल्लोष
By admin | Updated: February 23, 2015 00:21 IST