पुणे : जगातील सर्वच क्षेत्रांतील जागतिक दर्जाचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व निर्माण करण्याची जबाबदारी आता भारताकडे आली आहे. त्यामुळे देशाने या दिशेने कार्य करावे. त्यात शिक्षण संस्थांची भूमिका ही महत्त्वाची आहे. त्यांनी गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांची निर्मिती करण्यावर अधिक भर द्यावा,’ असे प्रतिपादन यूएसए येथील जागतिक कीर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत डॉ. राम चरण यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे डॉ. राम चरण यांना ‘भारत अस्मिता विशेष पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. या वेळी हार्वर्ड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार, लडाख येथील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. किरण मुजुमदार शॉ, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि चित्रपट निर्मात्या व लेखिका सई परांजपे यांना ‘भारत अस्मिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर व एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड व कुलगुरू डॉ. एन. टी. राव उपस्थित होते.
डॉ. रामचरण म्हणाले, देशाचे नेतृत्व करताना आज हॉवर्ड बिजनेस स्कूलमध्ये २२ सदस्य हे भारतीय आहेत. त्यात डॉ. दातार हे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असून ते जागतिक दर्जाचे नेतृत्व करून ग्लोबल लीडर्सची निर्मिती करीत आहेत. कोणत्याही क्षेत्रात असो, समर्पण भावनेने केलेल्या कार्याला यश मिळतेच. जागतिक दर्जाचे नेतृत्व करणारे गुगलचे सुंदर पिचाई हे भारतीय आहेत.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, आपण कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान अध्यात्म देते. त्यामुळे हा प्रवास संत ज्ञानेश्वर ते अल्बर्ट आइन्स्टाइनपर्यंतचा आहे. कोणीही आपले कर्तव्य विसरू नये.
डॉ. रघुनाथ माशेलकर,डॉ. विजय भटकर, राहुल शिंदे यांच्यासह सर्व पारितोषिक विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले.