इंदापूर : शहरातील पथदिव्यांचा खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रयत्नशील आहे. तो पूर्ववत होण्यासाठी महावितरणच्या विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आज (दि. २२) पत्रकार परिषदेत दिली.त्या म्हणाल्या की, नगरपरिषदेची महावितरणची थकबाकी ४ कोटी ९६ लाख ९ हजार ११९ रुपये एवढी आहे. दिवाबत्ती विभागाचे व्याज व दंडासह थकीत वीजबिल रुपये २ कोटी ५९ लाख ९२ हजार २५० रुपये. पाणीपुरवठा विभागाचे व्याज व दंडासह २ कोटी ३६ लाख १६ हजार ८६० रुपये अशी त्याची वर्गवारी आहे. नगरपरिषद चालू बिले नियमित भरत आहे. परंतु, मागील थकबाकीची रक्कम तसेच व्याज व दंडासह वाढलेली रक्कम नगरपरिषदेस त्वरित भरणे शक्य नाही. यासाठी विभागीय स्तरावर संपूर्ण व्याज माफ करावे. उर्वरित वीजबिलापोटी समान हप्ते करून द्यावेत. हे बिल देण्यासाठी १४व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत प्राप्त मिळणाऱ्या निधीमधून मंजुरी देण्याची नगरपरिषदेची शिफारस आहे, असे त्या म्हणाल्या.याबाबत मंगळवारी (दि.२१) झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत वीजबिल भरण्याचा विषय घेतला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याबाबतच्या ठरावाच्या विरोधात मतदान केले. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून रक्कम देण्यास मंजुरी दिली नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, की इंदापूर नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. नगरपरिषदेच्या १०३ अनियमित कर्मचाऱ्यांचा पगार व इतर देणी देण्यासाठी २२ लाख रुपयांचा अतिरिक्त बोजा इंदापूर नगरपरिषदेस सोसावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषद स्वनिधीतून वीजबिल भरू शकत नाही.महावितरणने दि. १० मार्च रोजी दुपारी पाणीपुरवठा विभागाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर तातडीची बाब म्हणून चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून २० लाख रुपये महावितरणला देण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
इंदापूरचा वीजपुरवठा पूर्ववत होणार
By admin | Updated: March 23, 2017 04:07 IST