इंदापूर : बेकायदा जमाव जमवून लोणी देवकर (ता. इंदापूर) औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण करून कार्यालयातील साहित्याचे, वाहनांचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपावरून मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अमोल डोंगरे व त्यांच्या ३० ते ४० सहकाऱ्यांवर इंदापूर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील टेक्नो प्लॅस्टो कंपनीच्या कार्यालयात बुधवारी (दि. १६) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या कंपनीचे अधिकारी विजय ऊमादत्त मिश्रा (रा. लोणी देवकर, ता. इंदापूर) यांनी या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अमोल डोंगरे, मंगेश देवकर, तुषार चव्हाण व इतर ३० ते ४० जण बेकायदा जमाव जमवून टेक्नो प्लॅस्टो कंपनीच्या कार्यालयात घुसले. तेथील अधिकारी तथा फिर्यादी मिश्रा यांना ‘तू आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केले नाहीस व आम्हाला ठेका दिला नाहीस तर तुला जीवे ठार मारू’, अशी धमकी देवून मिश्रा यांना या सर्वांनी लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. कार्यालयातील लॅपटॉप, खुर्च्यांचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, फिर्यादी विजय मिश्रा यांनी खोटी तक्रार केली आहे, असे अमोल डोंगरे यांच्या निकटवतीर्यांनी सांगितले. मिश्रा व इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडे कामगार भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असा आग्रह स्थानिक लोक पूर्वीपासून करत आहेत. टेक्नो प्लॅस्टो कंपनीमध्ये किमान ४५० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये स्थानिकांना संधी दिली जावी, या मुद्यावर चर्चा करण्यासाठी लोक गेले होते. मात्र, तेथे मिश्रांकडून अवमानकारक वागणूक दिली गेली. त्यामुळे लोक संतप्त झाले. त्यातून उद्भवलेल्या वादावादीला मिश्रा यांनी मारहाणीचे स्वरुप दिले, अशी माहिती देण्यात आली.
इंदापूर एमआयडीसीत अधिकाऱ्याला मारहाण
By admin | Updated: September 18, 2015 01:15 IST